
हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सबंध जिल्ह्यातून हजारो बंजारा बांधव या मोर्चात पारंपारिक वेषात सहभागी होते. मोर्चाचे नेतृत्व संयोजक डॉ.बी.डी.चव्हाण यांनी केले.
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात विविध तालुक्याच्या ठिकाणी बंजारा समाजाने मोर्चाव्दारे आवाज उठविला आहे. आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यासह तेलंगणा, विदर्भ व कर्नाटक सिमेवरील हजारो बंजारा बांधव आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. पारंपारिक वेशात व पारंपारिक वाद्यासह या मोर्चात बंजारा बांधव सहभागी झाले होते. सकाळी साडेअकरा वाजता नविन मोंढा येथून या मोर्चाला सुरुवात झाली. अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट उड्डान पूल, चिखलवाडी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा मार्गे हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा तसेच युवकांचा सहभाग होता. या मोर्चात दिल्लीच्या रोहिणी बानोत-आडे आणि संजीवकुमार यांनी प्रेरणा गीत सादर केले. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, बंजारा समाजाच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या त्वरित मान्य कराव्यात, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. नांदेडच्या रस्त्यावर सर्वत्र आज पारंपारिक वेशभूषेतील बंजारा बांधव सामील झाले होते. वाजंत्री, पारंपारिक वाद्य, अश्व रथ, भजनी मंडळी आदी या मोर्चात सहभागी होते. त्यामुळे सबंध नांदेड शहर दणाणून गेले होते. बंजारा समाजावर होत असलेला अन्याय शासनाने दूर करुन या समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून तात्काळ आरक्षण देवून त्यांना सर्व सवलती लागू कराव्यात, अशी मागणी यावेळी मोर्चेकर्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी बंजारा समाजाचे अनेक नेते, बंजारा विद्यार्थी संघटनेचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी समाजाच्या वतीने भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पार्कींगची व्यवस्था करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ.बी.डी.चव्हाण यांनी बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, राज्य सरकारकडे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे आहेत. हैद्राबाद गॅझेटीयर मध्ये बंजारा समाजाचा स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंदवला गेला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जयपालसिंघ यांनीही राष्ट्रपती व पंतप्रधानाकडे तसेच संसदेतही याबाबत आवाज उठविण्यात आला. याशिवाय समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आयोग स्थापन करण्यात आले त्या आयोगानेही बंजारा समाज एसटी दर्जाच्या मान्यतेस पात्र असल्याचे नोंदवले गेले आहे. यामध्ये 1965 चा लोकुर आयोग, 1980 मंडल आयोग, 2004 न्यायमूर्ती बापट आयोग, 2014 चा भाटीया आयोग अशा विविध आयोगाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पात्र ठरविले आहे. तशा शिफारसीही केल्या आहेत. मात्र जाणीवपूर्वक बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे एसटीमध्ये ज्या आदिवासींना 60 टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला स्वतंत्र तीन टक्के आरक्षण देण्यात यावे, यानुसार आदिवासींना अ मध्ये तर बंजारा समाजाला ब वर्गवारीमध्ये आरक्षण द्यावे, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे डॉ.बी.डी. चव्हाण यांनी सांगून यह तो अभी झांकी है, असा इशारा सरकारला देवून आता आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही ठणकावून सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांची भाषणे झाली. पोलिसांनी यावेळी तगडा बंदोबस्त ठेवला होता.