चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागवेलीच्या पानांचा विडा खाऊ घातला, नांदेडमधील अघोरी प्रकार

चोरीच्या संशयावरून गावातील दोघांना थंड पाण्यात बुडवून मंतरलेल्या नागवेलीच्या पानाचा विडा खाऊ घालण्याचा अघोरी प्रकार नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील केरूर येथे घडला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल असून याप्रकरणी एका मांत्रिकासह केरूर येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, केरूर येथे राहणाऱ्या रामा नारायण आरोटे यांच्या घरी जुलै महिन्याच चोरी झाली होती. ही चोरी गावातील परमेश्वर राठोड आणि अन्य एकाने केली असा संशय आरोटे यांना होता. त्यांनी ही बाब काही जणांना बोलूनही दाखवली. खरे-खोटे करण्यासाठी काहींना त्यांना मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. यानंतर आरोटे यांनी धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथे राहणाऱ्या भोंदू बाबा गंगाराम सुनका कादरीशी संपर्क साधला आणि त्याला सर्व माहिती दिली.

भोंदू बाबा आरोटे यांना तांदूळ टाकून मंतरलेले नागवेलीच्या पानांचे दोन विडे दिले. चोरीचा संशय असलेल्यांना हे विडे थंड पाण्यात बुडवून खायला द्या, असे भोंदू बाबाने आरोटे यांना सांगितले. त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी चोरीचा संशय असलेल्या परमेश्वर राठोड आणि अन्य एकास गावातील मंदिरासमोर बोलावण्यात आले. तिथे सर्वांसमोर दोघांना थंड पाण्याने भिजवण्यात आले आणि त्यानंतर त्यांना मंतरलेले विडे खाण्यास सांगितले.

हा सर्व प्रकार गावातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या अघोरी प्रकाराने आपल्याला मानसिक आणि शारीरिक वेदना झाल्याची तक्रार पीडित परमेश्वर राठोड यांनी दिली आहे. या तक्रारीवरून भोंदू बाबा गंगाराम कादरी यांच्यासह रामा आरोटे, गंगाराम आरोटे आणि राजू आरोटे यांच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस स्थानकात महाराष्ट्र नरबळी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.