Nanded Crime News : 52 वर्षानंतर पहिल्यांदाच कौठा गावात पडला सर्वात मोठा दरोडा

नांदेड जिल्ह्यात विशेषकरून नांदेड शहरामध्ये चोऱ्या, लुटमार, चैन स्नॅचिंग सारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच कंधार तालुक्यातील कौठा परिसरातील एका व्यापाऱ्याच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या दरोड्यात जवळपास 35 लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी चोरून नेला आहे.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मागील काही दिवसांपासून कौठा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज गावांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. कधी गोठ्यातील जनावरे तर कधी शेतकऱ्यांच्या विहीरीवरील मोटारी चोरीला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. अशातच दरोडेखोरांनी कौठा परिसराती व्यापारी कृषी केंद्र चालक गजानन येरावा यांच्या घरावर डल्ला मारला. पाच ते सहा दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला करून पती पत्नीला जबर मारहाण करत 40 तोळे सोने व 20 लाख रुपये लंपास केले. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार 1972 सालानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा दरोडा कौठा गावात पडला. दरोडेखोरांच्या दहशतीमुळे येरावा कुटुंबीय तक्रार दाखल करण्यास घाबरत होते. पंरतु हिंमत करत त्यांनी दरोडेखोरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सर्व दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरी करण्यासाठी त्यांनी पांढर्‍या रंगाच्या बोलोरो गाडीचा वापर केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कंधारचे पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा तपास पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकोटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि इतर पोलीस कर्मचारी घटनेचा तपास करत आहेत.

कौठा भागातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि चौऱ्यांचे प्रमाण मागील तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या भागातील नागरिक दहशतीखाली आहेत. या भागामध्ये पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी अनेकवेळा केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.