
नांदेडमधील ई-स्क्वेअर परिसरातील खुनाची घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री लोहारगल्ली जवळील भागात आणखी एकाचा खून झाला. धारदार शस्त्राने वार करत 35 वर्षीय युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री नांदेड तीन खुनांनी हादरले होते. ई-स्क्वेअर भागात एका तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती आि या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. रुग्णालयात भरती करण्यात येत असताना हल्लेखोरांनी या दोघाचीही हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री लोहारगल्ली परिसरात जुन्या वादामधून रणजितसिंह तबेलेवाले उर्फ रज्जा (वय – 35) याच्यावर दोन हल्लेखोरांनी तलवारीने सपासप वार केले. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.
वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी जखमी रणजितसिंहला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी पहाटे यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी ‘दै. सामना’ला दिलेल्या माहितीनुसार, लोहारगल्लीतील रणजितसिंह तबेलेवाले यांच्या खुनाच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मनप्रितसिंग परविंदरसिंग काचवाले (वय – 23) आणि परमज्योतसिंग परविंदरसिंग काचवाले (वय – 25, दोघेही रा. अफजलनगर नांदेड) अशी दोघांची आहेत. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

























































