
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठा पैकी एक पुर्ण व मुळपिठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुका माता गडावर आज दि. २२ सप्टेंबर रोजी परंपरेनुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेला ‘श्री रेणुका माता कि जय च्या’ च्या गजरात पहिल्या माळीला सुरुवात झाली.
अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरुवात केली. गणेश पुजन, कलश पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन, ऋग्वेद, पारायण शतशुक्ती पारायन करण्यात आले. पंचामृताने अभिषेक करण्यात आला. सिंगार, अलंकार करून पिवळया रंगाचे पैठणी महावस्त्र परिधान करण्यात आले. श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभार्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदीर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका पाषानाच्या कुंडामध्ये मृत्तिका (माती) भरुन त्यात संप्त धान्य टाकून नागवेलीची पाने व श्रीफळ, साभोताल पाच उसाचे धांडे उभारुन आणि त्याआधारे कलशावर (पुष्पहार) पहिली माळ चढवून सकाळी 11वाजता संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश सूनिल वेदपाठक, सहा.जिल्हाधिकारी तथा सचिव जेनित चंन्द्रा दोन्तुला, कोष्याध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, दुर्गादास भोपी, यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. व कुमारीका पुजन करण्यात आले. आरती करण्यात आली. पायस नैवेद्य गायीचे तुप व दुपारी श्री मातेस महानैवेद्य ठेवून महाआरती करण्यात आली.
नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती पूजन करण्यात आले. अखंड नंदादिप पूजन, सुवर्ण अलंकार पूजन करण्यात आले. श्री दुर्गासप्तशती शतचंडी पाठाची सुरुवात, संकल्प, चतुर्वेद वेद पारायण सुरुवात करण्यात आली. पायस नैवेद्य, गायीचे तुप, छबीना परिवार देवता पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी परशुराम मंदिर परीसरात महाप्रसाद सुरु करण्यात आला.
प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदिरात अखंड देवी समोर नंदादिप तेवत ठेवून दररोज पायास म्हणजे दहीभात, पुरण पोळीचा नवैद्य, आरतीनंतर छबिना कढला जावून रेणुका ज्या गडावर प्रकटली त्या गडाला प्रदक्षीना घालुन छबिना परत रेणुका मंदिरात येत असतो.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडावर जाणार्या रस्त्याावरील टि.पॉइंट व मेन रोडवर पोलीसांनी बॅरीकेट लावून खाजगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी केली आहे. एसटी महामंडळाकडून 120 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायतकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहिल्याच माळीला महाराष्ट्, तेलंगणा राज्यातील भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके हे आपल्या कर्मचार्यांसह चोख बंदोबस्त ठेवत आहेत.