नांदेडच्या महापौर शिलाबाई किशोर भवरे यांचा अखेर राजीनामा

7

सामना प्रतिनिधी । नांदेड

पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आज अखेर महापौर शीलाबाई किशोर भवरे यांनी आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत आपला राजीनामा आयुक्त काकडे यांच्याकडे सादर केला. मात्र उपमहापौर विनय पाटील गिरडे यांचे पद मात्र तरले आहे. तुर्तास त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही.

मोठ्या प्रमाणात नगरसेवकांच्या वाढलेल्या अपेक्षा व महापौरपदी निवड होतानाच सव्वा वर्षाचा कालावधी ठरविण्यात आल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आज महापौर शीलाबाई किशोर भवरे यांनी सर्वसाधारण सभेच्या शेवटी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त काकडे यांच्याकडे सादर केला. आपल्या राजीनाम्यानंतर मनोगत व्यक्त करताना गेल्या सतरा महिन्यात केलेल्या कामाचा त्यांनी आढावा दिला. शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे डांबरीकरण, राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या काळात उभारण्यात आला याबद्दल धन्यता मानत असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण आपल्या पदाचा वापर केला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आ.डी.पी.सावंत, आ.अमर राजूरकर, आ.अमिता चव्हाण तसेच सभागृहातील सर्व सदस्यांच्या पाठबळामुळेच आपण गेली सतरा महिने शहराच्या विकासासाठी योगदान देऊ शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. महापौरांच्या राजीनाम्यानंतर सभागृहनेते विरेंद्रसिंग गाडीवाले, अब्दुल सत्तार, शेख फारुख, बापूराव गजभारे, विरोधी पक्षनेत्या सोढी, संगीता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करुन त्यांच्या कार्यकाळात चांगली कामे झाल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान काल रात्री पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतर उपमहापौर पद उपमहापौर विनय पाटील गिरडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. ते या आपल्या पदावर सध्या तरी कायम असून, त्यांचे उपमहापौरपद तरले आहे. याबद्दल नेमकी काय चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही. नियमानुसार महापौर पदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल व त्यानंतर नव्या महापौर पदाची निवड व त्याची प्रक्रिया सुरु होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. आता नव्या महापौरपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून, यात दिग्गज नगरसेवकांनी आपल्या समर्थकांमार्पâत यासाठी फिल्डींग लावली आहे.