
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथे सततच्या नाफिकीने आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पिता-पुत्राने आत्महत्या केली आहे. राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय – 43) आणि त्यांचा शाळकरी मुलगा ओमकार राजेंद्र पैलवार (वय – 16) अशी पिता-पुत्राची नावे आहेत. दोघांनीही स्वत:च्या शेतात गळफास घेत मृत्युला कवटाळले. गुरुवारी (9 जानेवारी) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र पैलवार यांना बिलोली तालुक्यातील मिनकी येथे 2 एकर शेती आहे. या जमिनीवर त्यांना साडे चार लाखांचे कर्ज होते. महाराष्ट्र ग्रामीण बँक (खतगाव) या शाळेकडून त्यांनी कर्ज घेतले होते. सततची नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा याची चिंता त्यांना होती. यावरून घरात खटकेही उडत होते.
राजेंद्र यांचा मुलगा ओमकार हा उदगीर येथे शिक्षणास होता. संक्रातनिमित्त तो गावाकडे आला होता. 8 जानेवारी रोजी दुपारी ओमकाराने वडिलांकडे नवीन कपडे, शालेय साहित्य आणि नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी हट्ट केला. मात्र वडिलांनी सध्या पैसे नाहीत, काही दिवस थांब. पैसे आले की घेऊन देतो असे म्हटले. त्यामुळे नाराज झालेला ओमकार रात्रीच्या सुमारास शेतात गेला आणि तिथेच झाडाला गळफास घेतला.
मुलगा घरी नसल्याचे पाहून राजेंद्र पैलवार हे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करू लागले. यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला ओमकार याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. हे पाहताच वडिलांचेही अवसान गळाले आणि त्यांनी मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने त्याच झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावावर शोककळा
कर्जबाजारीपणामुळे पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावावर शोककळा पसरली असून पैलवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






























































