
जून महिन्यात नांदेड स्पेशल एक्स्प्रेसमध्ये एका डॉक्टर दांपत्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला करून पसार झालेला चोरटा अखेर सापडला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्याला केरळ पोलिसांकडून ताब्यात घेतले.
पनवेल येथे राहणारे डॉ. योगेश देशमुख आणि डॉ. दीपाली देशमुख हे दांपत्य 4 जून रोजी 9 वर्षांची मुलगी श्रद्धासोबत नांदेड येथे नातेवाईकाकडे निघाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून त्यांनी रात्री 1 वाजता सुटणारी एलटीटी-नांदेड स्पेशल ट्रेन पकडली होती. तिघे जण एस-4 या एसी बोगीत असताना एक अनोळखी इसम ट्रेनमध्ये शिरला. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास त्याने डॉ. दीपाली देशमुख यांच्या खाद्यावरील पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला दीपाली यांनी प्रतिकार केला. या खेचाखेचीत त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना डब्याच्या खाली खेचले आणि त्या ट्रेनखाली पडल्या. तो गोंधळ पाहून डॉ. योगेश यांनीदेखील ट्रेनमधून खाली उडी मारली. त्यात त्यांचा डावा हात तुटून खाली पडला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. अखेर त्याला केरळ पोलिसांनी एका गुह्यात पकडले असल्याचे समजताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. मोहम्मद सैफ ऊर्फ असगर अली चौधरी असे त्या आरोपीचे नाव आहे.