
>> विजय जोशी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षात घराणेशाही चालत नाही असे छातीठोकपणे जाहीरपणे सांगतात, मात्र नांदेड जिल्ह्यात चव्हाण परिवाराच्या घराणेशाहीनंतर नगर परिषदेच्या लोहा येथील निवडणुकीत निवडणूक प्रभारी खासदार अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून नगराध्यक्ष पदासह एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ज्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे अशा सहा जणांना उमेदवारी दिली आहे. पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणार्या भाजपने एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
ते स्वतःला महाराष्ट्राचे, जिल्ह्याचे नेते समजतात त्यांना उमेदवार मिळत नसतील तर काय करतील, एका घरात सहा नाही दहा उमेदवार देतील, शेवटी त्यांना पॅनल उभा करायचं आहे. उमेदवार किती आहेत हे महत्त्वाचं नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण आणि भाजपावर केली आहे.




























































