
माहूर शहरातील प्रसिद्ध देवदेवेश्वरी मंदिर परिसरात एका आक्रमक वानराने गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शनिवारी (14 मार्च 2026) एकाच दिवशी तब्बल 10 पेक्षा अधिक भाविक आणि नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वानराच्या सततच्या हल्ल्यांमुळे मंदिर परिसरात येणारे भाविक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वानराचा उपद्रव वाढल्याने नागरिक भयभीत झाले होते, अखेर या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने पावले उचलली.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी पुसद येथील वनविभागाच्या बचाव पथकाला पाचारण केले. या पथकाने विशेष मोहीम राबवून आक्रमक वानराला शिताफीने जेरबंद केले, ज्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या मोहिमेत वनपाल मुकबीर, आतिश राठोड, केशव गेडाम यांच्यासह स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, वानराच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.




























































