बहुचर्चित धान्य घाटोळ्याचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

विजय जोशी । नांदेड

नांदेड येथे झालेल्या धान्य घोटाळ्याच्या तपासाची सूत्रे आता गुन्हे अन्वेषण विभाग आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हे आदेश पोलीस महासंचालकांनी जारी केले आहेत. त्यामुळे लवकरच हा सर्व कागदपत्रांचा अभिलेख आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होईल. या शाखेत अत्यंत पारदर्शक व्यक्तीमत्व असलेले रामानंद आणि संजीव सिंगल हे अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे नुरुल हसन या नांदेडच्या सहायक पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासापेक्षा जास्त बारकाईने धान्य घोटाळ्याचा तपास होईल आणि धान्य घोटाळ्यातील प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या चुकीप्रमाणे त्याची जागा दिसेल हे आता स्पष्ट झाले आहे.

नांदेडमध्ये चंद्रकिशोर मीणा पोलीस अधीक्षक असताना त्यांच्या पथकाने कृष्णूर ता.नायगाव येथील इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीमध्ये छापा टाकून 10 ट्रक धान्य पकडले. हे सर्व धान्य सरकारी धान्य होते. त्यात काही ट्रकमध्ये गहू आणि काही ट्रकमध्ये तांदुळ होता. सोबतच इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोडावूनमध्ये पोलिसांनी काही गहू साठा जप्त केला. त्या जप्त साठ्याची आकडेवारी लिहितांना सहा हजार लिहिली गेली. पण प्रत्यक्षात महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त तपासणीमध्ये तो साठा 2 हजार पाचशे पोते निघाला. त्याठिकाणी इतर 25 हजारपेक्षा जास्त भुसा भरलेले पोते होते. सोबतच त्यांच्या दुसNया एका गोडावूनमध्ये असाच भुसा भरलेल्या पोत्यांची रास जमविलेली आहे.

सुरुवातीच्या काळात पहिल्याच दिवशी दहा ट्रक चालकांना पकडले. त्याशिवाय अ‍ॅग्रो इंडिया कंपनीचे संचालक अजय बाहेती, त्यांचे व्यवस्थापक तापडीया, वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि इतर अनेक शासकीय अधिकारी आरोपी असल्याचा अहवाल पोलिसांनी शासनाला पाठविला आहे. पुढे हा तपास धर्माबादचे सहायक पोलीस अधीक्षक, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी नुरुल हसन यांच्याकडे देण्यात आला. या तपासादरम्यान प्राप्त माहितीनुसार नुरुल हसन यांनी या घटनेचा सखोल तपास करुन पुराव्यानिशी अहवाल सादर केला आहे. दरम्यान राजकीय वजन वापरुन हा तपास नुरुल हसन कडून काढून घेण्याचा प्रयत्न झाला. पण पोलीस महासंचालकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. सोबतच नुरुल हसन यांची बदली नांदेड जिल्ह्यातून दुसरीकडे करण्याचे खलबत जवळपास यशस्वी झाले होते. पण त्यातही अंतिम विजय नुरुल हसन यांच्या पारड्यात पडला.

दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी नुरुल हसन यांना मुंबई येथे बोलाविले होते. आपल्या तपासाच्या सर्व कागदपत्रांसह नुरुल हसन तेथे गेले. त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या तपासाच्या प्रगतीचा अहवाल पोलीस महासंचालकांसमोर मांडला तेंव्हा पोलीस महासंचालकांनी त्यांची पाठ थोपटली. गुन्ह्याचा तपास नुरुल हसनकडून बदलावा याच्या प्रयत्नात असलेल्या राजकीय मंडळींना पोलीस महासंचालकांनी चांगलाच हिसका दाखवला आणि हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक शाखेकडे वर्ग केला आहे.

मागील काळात पोलीस आणि महसूल विभाग यांच्यात जुंपल्याचा प्रकार समोर आला होता. पण नांदेडमध्ये आलेले नविन पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि नुरुल हसन यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेवून केलेल्या सादरीकरणानंतर त्यांना बऱ्याचअंशी समाधान झाले. हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांनी नुरुल हसन यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या जिल्ह्यातील ज्या सरकारी धान्याच्या गाड्या इंडिया मेगा कंपनीत रिकाम्या झाल्या त्यांच्यावर अत्यंत जलदगतीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

आता या गुन्ह्याचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे गेल्याने अत्यंत आरामात, पूर्ण बारकाईने आणि प्रत्येक गुन्हेगाराला त्याची जागा दाखविणारा ठरणार आहे. कारण त्यांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी अगोदरच पूर्ण करुन ठेवलेल्या आहेत.