
नांदेड जिल्हा परिषदेच्या 2020-21 च्या सुधारित व सन 2021-22 चा मुळ अर्थसंकल्प शिवसेनेच्या जि.प. उपाध्यक्षा तसेच अर्थ व आरोग्य सभापती पद्मा रेड्डी सतपलवार यांनी आज जि.प. च्या विशेष सभेत सादर केला. वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये महिलांना प्राधान्य, कोरोना विषाणु संसर्गासंदर्भात आरोग्य विभागासाठी विशेष तरतुद, ग्रामीण भागातील योजनांसाठी दोन कोटीची तरतूद ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, विविध विषय समित्यांचे सभापती यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेच्या जि.प. उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार यांनी गतवर्षीचा सुधारित व यावर्षीचा मुळ अंदाजपत्रक सादर करताना शिल्लकिचा अर्थसंकल्प सादर करत असल्याचे सांगितले. 2020-21 ची सुधारित जमा 27 कोटी 44 लक्ष 39 हजार 851 रूपये एवढी असून महसुली खर्च 27 कोटी 43 लक्ष 47 हजार 590 रूपये ऐवढा आहे. सन 2021-22 च्या मुळ अंदाज पत्रकात महसुली जमा 19 कोटी 6 लक्ष 915 रूपये तर महसुली खर्च 19 कोटी 4 लक्ष 76 हजार 646 रूपये ऐवढा अंदाजीत आहे. त्यामुळे यावर्षात 1 लक्ष 24 हजार 269 रूपये एवढी शिल्लक अपेक्षित आहे.






























































