महाराष्ट्रात आदिवासींच्या संतापाचा स्फोट, नंदुरबारमध्ये मोर्चा हिंसक; संतप्त आंदोलकांची दगडफेक… गाड्या फोडल्या; पोलिसांचा लाठीमार

महाराष्ट्रात आदिवासींच्या संतापाचा स्फोट झाला आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी काढण्यात आलेल्या आदिवासी मोर्चाला नंदुरबारमध्ये हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने दगडफेक करीत वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. लाठीहल्ला व अश्रुधुराचा वापर करून पोलिसांनी जमावाला पांगविले. यावेळी मोर्चेकऱयांसह पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नंदुरबार शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शहरात सायंकाळी संचारबंदीसारखे वातावरण होते.

नंदुरबारच्या सिंधी कॉलनीत 16 सप्टेंबर रोजी दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून सूर्यकांत मराठे याने धारदार वस्तूने जयेश भिल्ल या तरुणाची हत्या केली. तेव्हापासून तीव्र पडसाद उमटत असून जिल्हय़ात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आज जिल्हय़ासह गुजरात, मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि कार्यालयाच्या आवारातच दगडफेक होऊन मोर्चाने हिंसक वळण घेतले. परिसरातील खासगी व सरकारी अशा अकरा ते बारा वाहनांची तोडफोड करण्यात आली. आरटीओ कार्यालय आवारात एक दुचाकी जाळण्यात आली. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली.

सोशल मीडियातून आवाहन

जयेश भिल्लच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हय़ात गेल्या आठवडय़ात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. आज विविध आदिवासी संघटनांनी सोशल मीडियावरून निषेध मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. नंदुरबार शहरातील नेहरू चौकात सकाळी 10 वाजल्यापासूनच आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने जमा झाले. आंदोलकांच्या हातात निषेधाचे फलक होते.

आंदोलकांची मागणी काय?

जयेश भिल्ल हत्याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, आरोपीची नार्कोटेस्ट करण्यात यावी, फास्टट्रक कोर्टात सुनावणी होऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा आदिवासींच्या मागण्या आहेत.

 जिल्हाधिकारी कार्यालयात हजारोच्या संख्येने मोर्चेकरी पोहोचले तोपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र, त्यानंतर दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दगडफेक झाली आणि हिंसाचार उफाळून आला.

सहा पोलिसांसह 10 जखमी

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शहरात सशस्त्र बल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचारात सहा पोलीस, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्यासह दहाजण जखमी झाले असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.