
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्याच वर्षी त्यांनी हिंदुस्थानींनी आठवड्याला 70 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. त्यांच्या या मतावर त्यावेळी जोरदार टीका देखील झाली होती. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानी तरूणांना मोलाचा सल्ला दिला आहे. दररोजच्या कामात अविभाज्य भाग बनलेल्या AI कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी तरुणांना सावध केले आहे. एआयमुळे नोकऱ्या जातील या भीतीपेक्षा, या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःला अधिक कार्यक्षम बनवण्यावर त्यांनी भर दिला आहे.
एआय हे मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नसून ते एक ‘साहाय्यक’ साधन असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वतः जेनेरेटिव्ह एआयचा वापर करून पाहिले असून, त्यांचा अनुभव शेअर केला आहे. ते म्हणाले की, अधिक हुशार आणि सर्जनशील व्यक्ती या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची उत्पादकता अनेक पटींनी वाढवू शकतात. एआय केवळ सामान्य कामे करू शकते. परंतु उच्च दर्जाचा विचार आणि नवनिर्मितीसाठी मानवी मेंदूचीच गरज भासणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.
तरुणांनी एआयला शत्रू म्हणून पाहू नये, तर एक साधन म्हणून ते समजून घेतले पाहिजे आणि सुज्ञपणे वापरले पाहिजे. मूर्ती यांच्या मते, या तंत्रज्ञानावर आपली पकड मजबुत करण्यासाठी AI चा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. तरुणांनी AI शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ताण घेण्याची गरज नाही. यासाठी शिस्त, मेहनत, चिकाटी आणि शिकण्याची जिद्द असणे फार महत्त्वाचे आहे, असे नारायण मूर्ती यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानातील बदलांमुळे काही जुन्या नोकऱ्या नक्कीच कमी होतील. परंतु यामुळे नवनवीन संधीही निर्माण होतील. स्वायत्त वाहने आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांत एआयमुळे मोठी क्रांती होईल. अशा परिस्थितीत तरुणांनी घाबरून न जाता त्यातून शिकण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. जे तरुण सतत नवनवीन गोष्टी शिकतील आणि एआयवर प्रभुत्व मिळवतील, त्यांनाच भविष्यात मागणी असेल, असे नारायण मूर्ती म्हणाले.
हिंदुस्थानने चीनचे ‘9-9-6 मॉडेल’ वापरावे; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला 72 तास काम करण्याचा सल्ला


























































