
संसद अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा केली. केंद्रीय माहिती आयोग व दक्षता आयोगासह विविध संस्थांमधील नियुक्त्यांच्या मुद्दय़ावर ही चर्चा झाली.
विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी हे देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या निवड समितीवर आहेत. त्या भूमिकेतून आज त्यांची मोदी-शहांसोबत बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय दक्षता आयोग व केंद्रीय माहिती आयोगावरील नियुक्त्यांसाठी सरकारकडून काही नावांची शिफारस करण्यात आली. या नावांवर बराच वेळ चर्चा झाली. पेंद्र सरकार स्वायत्त संस्थांच्या अधिकारांचा संकोच करत असल्याची चिंता राहुल यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारने सुचवलेली नावे मान्य होण्यासारखी नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. त्यांनी आपला विरोध लेखी स्वरूपात नोंदवून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.



























































