मोदी ट्रम्प यांचे नाव घेईनात; आता म्हणाले, हिंदुस्थान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल

हिंदुस्थान ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. आपण 10 व्या क्रमांकावरून पहिल्या 5 व्या क्रमांकावर आलो आहोत. लवकरच पहिल्या 3 मध्ये येऊ. ही ताकद सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनातून आली आहे, असे  प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परंतु, त्यांनी यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. बंगळुरू येथून त्यांनी पुणे-नागपूरसह 3 वंदे भारत एक्स्प्रेस गाडय़ांना हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर ते बोलत होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी हिंदुस्थान आणि रशियाची अर्थव्यवस्था मेल्याचे म्हटले होते. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवूनही मोदी यांनी अद्याप ट्रम्प यांचे नाव कुठेही घेतलेले नाही. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना हिंदुस्थानी सैनिकांची दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला गुडघे टेकण्याची क्षमता संपूर्ण जगाने पाहिली आहे. त्याच्या यशामागे आपल्या तंत्रज्ञानाची आणि मेक इन इंडियाची शक्ती आहे, असेही ते म्हणाले.