
‘‘आजचा हिंदुस्थान विकासासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी अधीर झाला आहे. गेल्या 25 वर्षांत अनेक आव्हाने आली. पण ही आव्हाने आणि अडथळे हिंदुस्थानच्या विकासाचा वेग रोखू शकले नाहीत,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. देशाच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी या वेळी भाष्य केले. ‘‘हिंदुस्थान हे जगासाठी आता केवळ मार्केट राहिलेले नाही, तर आर्थिक विकासाचे व आशा-आकांक्षेचे मॉडेल बनले आहे. अनेक अडथळे येऊनही हिंदुस्थान प्रगती करत आहे. कोरोनाचे संकटही ही प्रगती थांबवू शकले नाही. जगात अस्थिरता असताना व शेजारी देशांत गृहकलह सुरू असतानाही हिंदुस्थानने 7 टक्क्यांचा विकास दर कायम राखला आहे,’’ असे मोदी म्हणाले.
देशाच्या विकासावर बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचाही दाखला दिला. हिंदुस्थानी जनतेच्या आशा-आकांक्षा खूप मोठय़ा आहेत. जे पक्ष त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाच लोक कौल देतात, हे बिहारच्या निकालांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले.
रामनाथ गोयंका यांच्या कार्याचे केले कौतुक
पत्रकारितेच्या माध्यमातून रामनाथ गोएंका यांनी केलेल्या कार्याचे व आणीबाणीच्या काळात दाखवलेल्या धाडसाचे मोदींनी कौतुक केले.
मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस
‘‘काँग्रेस पक्षात शिरकाव केलेल्या काही अर्बन नक्षलवाद्यांनी या पक्षाला मुस्लिम लिगी माओवादी बनवून टाकले आहे. या नव्या काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी देशहिताला तिलांजली दिली आहे. आजची मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस देशाच्या एकतेसाठी धोका बनली आहे,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.





























































