
सामना ऑनलाईन । मथुरा
मथुरा येथून लोकसभा निवडणूक लढविणारे बसपा, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार नरेंद्र सिंह आणि भाजपच्या उमेदवार हेमामालिनी यांच्यामधील लढत रंगतदार होणार आहे. हेमामालिनी यांच्या चेहऱ्यावरील मेकअपवरच सिंह यांनी हल्ला चढवला. ‘चेहऱ्यावरून जास्त विश्वासार्ह कोण आहे मी की हेमामालिनी, असा सवाल करीत सिंह यांनी ‘मी मेकअप करीत नाही. माझा खरा चेहरा लोकांसमोर असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे.’
याआधीही मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारमधील मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी हेमामालिनी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजपकडे मतदारांना आवडेल असा चेहराच नसून हेमामालिनी यांच्याकडून ठिकठिकाणी शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम करून मते मागितली जात असल्याची टीका सज्जन सिंह यांनी केली होती. मथुरामध्ये 18 एप्रिलला मतदान होणार असून सर्व पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

























































