
सामना प्रतिनिधी । कुडाळ
ऐतिहासिक किल्ले रांगणागडासाठी देण्यात आलेल्या निधीतील काम पूर्ण झाले आहे. नारूर गावातील नेटवर्कसह अन्य प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी दिली. नारुर – सरनोबतवाडी येथील साकवाचा लोकार्पण सोहळा नुकताच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच महालक्ष्मी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन राजा तेली यांच्या हस्ते तर महालक्ष्मी मंदिरजवळील हायमास्टचा लोकार्पण सोहळा पंचायत समिती उपसभापती सौ. श्रेया परब यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी जि.प.सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, राजू कविटकर, वर्षा कुडाळकर, माजी ग्रा. पं. सदस्य आबा तळेकर, माजी सरपंच मुकुंद सरनोबत, शाखाप्रमुख जगदीश सरनोबत, ग्रा .प.सदस्य आनंदी मेस्त्री, हिर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे, महेश सावंत, प्रकाश सरनोबत, एकनाथ सरनोबत, ज्ञानेश्वर सरनोबत आदींसह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. नारूर पंचक्रोशीतही बरीच कामे झाली आहेत. रांगणागडासाठी देण्यात आलेल्या निधीतून सोईसुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. नारूर मधील नेटवर्कची समस्या लवकरच मार्गी लावली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
गटनेते नागेंद्र परब म्हणाले, शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नारूर येथील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते पूर्णपणे सोडविण्याकडे आमचं लक्ष आहे. नारूर सरनोबतवाडी येथे साकव मंजूर करून आज त्या ठिकाणी दळणवळण सुरू झाले आहे. मुख्य रस्ता ते महालक्ष्मी मंदिर पर्यंतचा रस्ता लवकरच पूर्ण होणार आहे.महालक्ष्मी मंदिराकडे खासदार विनायक राऊत यांनी 3 लाख रुपये खर्च करून हायमास्ट उभा केला. तसेच रांगणागडासाठी 40 लक्ष रुपये खर्च करून त्या ठिकाणी बैठक व्यवस्था, कठडे ,दिवाबत्ती व्यवस्था अशी कामे खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून झाल्याचे परब यांनी सांगत यापुढेही या भागात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपसभापती श्रेया परब यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकूंद सरनोबत यांनी केले तर आभार आबा तळेकर यांनी मानले.
































































