नासाचे अवकाशयान आज सूर्याकडे झेपावणार !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

नासाचे सोलर पार्क प्रोब हे अवकाशयान शनिवारी दुपारी सूर्याकडे झेपावणार आहे. फ्लोरिडातील केप कॅनवेरल या तळावरून युनायटेड अलायन्स डेल्टा ४ हेवी रॉकेटद्वारे ते अवकाशात सोडण्यात येणार आहे. शनिवारी सूर्याकडे झेपावल्यानंतर काही महिन्यात ते सूर्याजवळ पोहचणार आहे. सूर्याजवळ जाणारे पृथ्वीवरील हे पहिलेच यान आहे. एवढा प्रखर प्रकाश आणि सर्वाधिक तापमानाचा सामना करणारे हे पहिलेच यान आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची ही महत्वाकांक्षी मोहीम आहे.

सोलर पार्क प्रोब यान सूर्याच्या जवळ जाऊन तेथील वातावरणाचा अभ्यास करणार आहे. सूर्याजवळील वातावरण, सूर्याची कार्यपद्धती, त्याचा आकार, वस्तूमान याबाबतची माहिती हे यान मिळवणार आहे. हे यान सूर्यापासून ४० लाख मैलावंरून प्रवास करणार आहे. २०२४ पर्यंत हे यान सूर्याला सात प्रदक्षिणा घालणार आहे. या यानात अनेक अद्ययावत उपकरणे आणि यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. तेथील शक्य तेवढी छायाचित्रे आणि माहिती हे यान पाठवणार आहे. या माहितीवरून सूर्याबाबत असलेले गूढ उकलण्यास वैज्ञानिकांना मदत होणार आहे. या माहितीतून पृथ्वीसह आपल्या आकाशगंगेच्या उत्पत्तीचे गूढही उकलू शकते असा विश्वास व्यक्त होत आहे.

सूर्याचा प्रखर प्रकाश आणि तापमानामुळे यानाचे नुकसान होऊ नये, यासाठी नासाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. या यानात थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे सौरउर्जपासून या यानाचा बचाव होणार आहे. तसेच यानात वॉटर कूलिंग सिस्टीमही बसवण्यात आली आहे. त्यामुळे यानाचे तापमान २९ अंशापेक्षा जास्त वाढणार नाही आणि यान व्यवस्थित त्याचे कार्य करू शकणार आहे.