NASA लॉन्च करणार पाण्याने उड्डाण भरणारे उपग्रह, ही आहे नवीन भविष्याची सुरुवात…

नासा (NASA) या महिन्याच्या अखेरीस पाथफाइंडर टेकनॉलॉजि डेमॉस्ट्रेटर (पीटीडी) अंतर्गत पहिल्यांदाच पाण्याने उडणारे क्यूबसॅट उपग्रह लॉन्च करणार आहे. हे उपग्रह फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल स्पेस स्टेशन येथून स्पेसएक्सच्या फाल्कन -9 रॉकेटमधून लॉन्च केले जाणार आहे.

क्यूबसॅटला नासाने V-R3x असेही नाव दिले आहे. हे उपग्रह रेडिओ नेटवर्किंग आणि नेव्हिगेशनमध्ये मदत करेल. पीटीडी प्रोजेक्ट मॅनेजर डेव्हिड मेयर यांनी सांगितलं की, ‘आम्हाला अशा लहान उपग्रहांसाठी एक नवीन आणि किफायतशीर प्रोपल्शन सिस्टम हवी होती. यामुळे अंतराळात प्रदूषण देखील होणार नाही. जर हे अभियान यशस्वी झाले तर भविष्यात हे तंत्रज्ञान मोठ्या उपग्रहांसाठी देखील वापरले जाऊ शकते.’

डेव्हिड यांनी सांगितलं की, जेव्हा कधी उपग्रहांमध्ये इंधन टाकण्याविषयी चर्चा सुरू होते, त्यावेळी त्यापासून होणाऱ्या धोक्यांची शक्यता तपासली जाते (उदा.विषाक्तता, ज्वलनशीलता इ.). मात्र भविष्यात पाण्याने उड्डाण करणाऱ्या उपग्रहांना असा धोका होणार नाही. तसेच उपग्रहांची एकमेकांशी टक्कर झाल्यास स्फोट होण्याची शक्यताही टाळता येईल.

डेव्हिड पुढे म्हणाले की, ‘क्यूबसॅटचे सौर पॅनल सूर्याच्या किरणांपासून उर्जा घेतील आणि ते प्रोपल्शन सिस्टमला ऊर्जा पुरवतील. जेणेकरुन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण पाण्यापासून वेगळे होऊ शकतील. जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूच्या स्वरूपात येतात तेव्हा त्यांची उर्जा खूप जास्त होते. यामुळे आम्हाला उपग्रहांची दिशा आणि सुरक्षा निर्धारित करणे सहज होणार आहे. ही एक अधिक सुरक्षित उर्जा प्रणाली आहे, ज्यामुळे भविष्यात बरेच उपग्रह उडण्यास सक्षम होतील.’

आपली प्रतिक्रिया द्या