
मानवाच्या अंतराळ मोहिमेतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून नासाचे ‘आर्टेमिस २’ हे ऐतिहासिक यान उद्या ११ एप्रिल २०२६ रोजी पृथ्वीवर परतणार आहे. चंद्राभोवतीचा आपला १० दिवसांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून चार अंतराळवीर ओरियन कॅप्सूलसह पॅसिफिक महासागरात उतरणार आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’ने याबाबत वृत्त दिले आहे. ५० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच मानवाने चंद्राच्या इतक्या जवळून प्रवास करून सुरक्षितपणे परतण्याचा हा मोठा पराक्रम केला आहे.
हा ऐतिहासिक क्षण हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार शनिवारी, ११ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ३७ मिनिटांनी पाहता येणार आहे. कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो किनारपट्टीवर पॅसिफिक महासागरात हे यान स्प्लॅशडाऊन करेल. अंतराळ प्रेमींना ही घटना नासाच्या अधिकृत वेबसाइटसह, नासा प्लस आणि युट्यूबवर थेट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानात नेटफ्लिक्सवर देखील पहाटे ४ वाजेपासून याचे थेट प्रक्षेपण सुरू होईल.
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ओरियन यानाचा वेग ताशी ४०,००० किलोमीटर इतका असेल आणि यावेळी घर्षणामुळे यानाचे तापमान २,७०० अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी यानाला विशेष हीट शील्ड बसवण्यात आले आहे. या मोहिमेत रीड व्हाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन या चार अंतराळवीरांनी अंतराळात प्रदीर्घ प्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.




























































