चारचौघात स्वत:ची लाज का काढताय? नेपोटिझम वादावर नसिरुद्दीन शहा यांची कडवी टिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता  सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून सध्या बॉलीवूडमध्ये रंगलेल्या नेपोटिझम वादाबद्दल ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही चर्चा अनावश्यक आणि बालिश आहे. चारचौघात स्वतःची लाज काढण्यासारखे आहे. सुशांत जिथे आहे, तिथे त्याला शांती मिळू दे असे वक्तव्य नसीरुद्दीन शहा यांनी केलंय.

‘कम्पेनियन’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शहा यांना सुशांतच्या प्रकरणाबद्दल विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना आपल्या खास शैलीत नसिरुद्दीन म्हणाले,  या प्रकरणाची चर्चा आता बालीश होत चालली असून माझ्या मते त्याची आवश्यकता नाही. जे आता पोस्टरवरदेखील दिसत नाहीत, ते टीका करत आहेत. आपली धुणी चारचौघात कशाला धुवायची? जर आपल्यापैकी प्रत्येकाने तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली तर फिल्म इंडस्ट्री पृथ्वीवरील सर्वात वाईट जागा म्हणून ओळखली जाईल. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडमध्ये गटतट पडले आहेत. आतले आणि बाहेरचे असा रंग देण्यात आला आहे. अनेक स्टार किड्सला लक्ष्य केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर नसिरुद्दीन यांनी मत व्यक्त केले आहे.