
वेळ दुपारी साडेचारची… जिल्हा प्रशासनाला हवाई दलाकडून एक संदेश मिळाला… केटीएचएम महाविद्यालयाच्या बोट क्लब इमारत भागातील हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली… इमारत आवारात सायरन वाजला… काही वेळातच पोलीस, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलासह सर्व यंत्रणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली… रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि अवघ्या तीस मिनिटांत हे ऑपरेशन अभ्यासअंतर्गत एअर रेड वॉर्निंग, फायर रेस्क्यू संबंधित मॉक ड्रील पार पाडले.
हवाई हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे, यादृष्टीने रंगीत तालीम घेण्याचे सरकारचे निर्देश होते. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाने मॉक ड्रीलची तयारी केली. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एअरफोर्सकडून संदेश आला आणि यंत्रणांनी केटीएचएमच्या बोट क्लब इमारतीकडे धाव घेतली. या ठिकाणी सायरन वाजला आणि नागरिकही सजग झाले. काही वेळातच रुग्णवाहिका दाखल झाल्या. अग्निशमन दल, पोलीस, एनसीसी, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत विविध संस्थांचे स्वयंसेवकही पोहोचले. अग्निशमनच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले, उपचारासाठी हलवले, नागरिकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा कामाला लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या संपूर्ण बचाव कार्यासाठी 30 मिनिटे इतका वेळ लागला. यातून विविध विभागांमधील समन्वयाचा, त्यात आवश्यक असलेल्या सुधारणांचा, तसेच आपत्कालीन प्रसंगाला जनता कशी तोंड देते याचा प्रशासनाला अंदाज आला.
नाशिकला ब्लॅक आऊटचे निर्देश नव्हते
नाशिक जिल्ह्यात केवळ एकाच ठिकाणी मॉक ड्रील घेण्यास सांगितले होते, तसेच ब्लॅक आऊटबाबत निर्देश नव्हते, आम्हाला मॉक ड्रीलसाठी दीड तास वेळ लागेल असे अपेक्षित होते, ते ३० मिनिटांत पूर्ण झाले. मात्र, गर्दी नियंत्रणासाठी जनतेत अधिक सजगता निर्माण करणे आवश्यक आहे. यापुढेही इतर ठिकाणी निर्देशांनुसार मॉक ड्रील होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.