नाशिक : चांदगिरीत बिबट्या जेरबंद, जिल्ह्यात दोन महिन्यात 12 बिबटे पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

नाशिक तालुक्यातील चांदगिरी भागात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात मंगळवारी पहाटे एक बिबट्या जेरबंद झाला. गेल्या दोन महिन्यात दारणा नदीकाठ परिसरात पिंजर्‍यात अडकलेला हा बारावा बिबट्या आहे.

दारणा नदीकाठ भागात गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्यांचा संचार, त्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यामुळे वनविभागाकडूनही या परिसरावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. या भागात सध्या 13 ठिकाणी पिंजरे आणि 26 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, मौजे चांदगिरी शिवारात के. के. फार्म येथे वनविभागाने काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. त्यात आज पहाटे बिबट्याची मादी अडकल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, गोविंद पंढरे व टिमने या बिबट्याला ताब्यात घेतले. या भागात आणखी बिबटे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे कायम ठेवण्यात आले आहेत.

गेल्या दोन महिन्यात वनविभागाच्या नाशिक परिक्षेत्रात 9, तर सिन्नरमध्ये 3 बिबटे पिंजर्‍यात अडकले आहेत.