
सामना प्रतिनिधी। नाशिक
येवला तालुक्यातील अंदरसूलमध्ये अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे साथीच्या रोगांनी थैमान घातले असून, आता डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील अंदरसूल हे गाव सर्वात मोठे गाव आहे. ग्रामपंचायत इतर ग्रामपंचायतींपेक्षा मोठी आहे. उघडय़ा गटारी आणि गल्लोगल्ली कचऱयांचे ढिग यामुळे संपूर्ण गावात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. चौकाचौकात उकिरडय़ांचे ढिग दिसत आहेत. राहत्या घरांसमोर डुकरांचा उच्छाद हा तर वर्षानुवर्षाचा आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून, कधीतरी गटारी साफ करून मैला जागेवरच टाकला जातो. यामुळे डासांचे मोठय़ा प्रमाणावर साम्राज्य असते. मलेरिया, विचित्र ताप असे साथीचे रोग नित्याचेच झाले आहे. याला पाणीटंचाईसुद्धा कारणीभूत ठरली आहे. आठ दिवसातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने प्लॅस्टिक, लोखंडी ड्रम व अन्य भांडय़ांमध्ये आठ दिवस पाणी साठवून ठेवावे लागते. साठविलेल्या या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे, यामुळे डेंग्यूचे रुग्ण येथे वाढले आहेत. एक सतरावर्षीय तरूण आणि एका पंचवीसवर्षीय महिलेला डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
























































