राज्य उत्पादन शुल्क विभागाची नाशिकमध्ये अवैध दारु तस्करीविरोधात मोठी कारवाई, 90 लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नाशिकमध्ये गोवा निर्मित अवैध मद्य तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी जळळपास 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे. सचिन बाळासाहेब भोसले (वय – 29, वर्षे रा. भोसले वस्ती, पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र-1 नाशिक यांना मुंबई-आग्रा महामार्गावरून गोवा निर्मित अवैध दारुची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालक्यातील पाडळीशिवार येथे हॉटेल पवनसमोर दारुची तस्करी करणाऱ्या ट्रकला (क्र. एमएच- 40, वाय- 4467) पकडले. या ट्रकमधून पोलिसांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले विदेशी मद्याचा साठा जप्त केला.

पोलिसांनी ट्रकमधून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 750 मि.ली.क्षमतेच्या 1380 सिलबंद बाटल्या (एकूण 115 बॉक्स), ऑल सिझन व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 600 सिलबंद बाटल्या (एकूण 50 बॉक्स), मॅकडॉवेल नं-1 व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 1200 सिलबंद बाटल्या (एकूण 100 बॉक्स), रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 3048 सिलबंद बाटल्या (एकूण 254 बॉक्स), रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 6000 सिलबंद बाटल्या (एकूण 125 बॉक्स) आणि ऑल सिझन व्हिस्कीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 2400 सिलबंद बाटल्या (एकूण 50 बॉक्स) असे एकूण 694 बॉक्स आणि बाराचाकी वाहन असा एकूण 89 लाख 93 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई भरारी पथक क्र.1 चे निरीक्षक जयराम जाखेरे. दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकुर, दुय्यम निरीक्षक राहुल राऊळ, दुय्यम निरीक्षक रोहित केरीपाळे, दुय्यम निरीक्षक एम. आर. तेलंगे, जवान सुनिल दिघोळे, विजेंद्र चव्हाण, धनराज पवार, एम.पी. भोये, राहुल पवार, गोकुळ परदेशी, किरण कदम यांच्या पथकाने पार पाडली असून पुढील तपास निरीक्षक जयराम जाखेरे करीत आहेत.