एक बटन दाबलं तर गिरीश महाजन जमीनदोस्त व्हाल, प्रफुल्ल लोढा यांचा इशारा; VIDEO व्हायरल

नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी प्रफुल्ल लोढा याला अटक करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा भाजपमध्ये असून तो मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. यातच आता प्रफुल्ल लोढा याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही X वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणाले आहेत की, “शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांना अर्पण हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेले प्रफुल लोढा म्हणत आहे की, एक बटन दाबले तर काय होईल? महाजन तुम्ही जमीनदोस्त व्हाल.”

व्हायरल व्हिडीओत प्रफुल्ल लोढा म्हणताना दिसत आहे की, “माझ्या स्वसंरक्षणासाठी मी दोन तारखेला जामनेर पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे, याचे बरेच पुरावे माझ्याकडे आहे. त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. बालब्रह्मचारी म्हणवणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सॲप कॉल करून मला जिवेमारण्याची धमकी दिली.”

प्रफुल्ल लोढा व्हिडीओत पुढे म्हणाला की, “गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे की, काही पुरावे असतील तर, त्यांनी पोलीस ठाण्यात द्यावेत. मला पुरावे पोलीस ठाण्यात देण्याची गरज नाही. कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे. परंतु मी एक मनुष्य आहे, मी कोणाला वहिनी म्हटलं आहे, कोणाला आई म्हटलं आहे, कोणाला मुलगी म्हटलं आहे. याची मर्यादा पळून मी अजून गप्प आहे. पर्यंत ज्यादिवशी आपले 100 पाप पूर्ण होतील, त्यादिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नाही.”