‘डोनेट अ डिव्हाईस’ चळवळीने ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाला बळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचविण्याचा उद्देश नाशिक जिल्हा परिषदेच्या ‘डोनेट अ डिव्हाईस’ या अभिनव चळवळीमुळे सफल झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने 147 स्मार्टफोन, संगणक यासह सुमारे 592 डिजीटल साधने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली असून, ऑनलाईन शिक्षणाला गती मिळाली आहे.

ग्रामीण भागात सर्वच पालकांकडे स्मार्टफोन नसल्याकारणाने शहराप्रमाणे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावर मात करण्यासाठी 15 जुलै रोजी ‘डोनेट अ डिव्हाईस’ ही चळवळ जिल्हा परिषदेने हाती घेतली. आपल्याकडील वापरात नसलेले जुने स्मार्टफोन, लॅपटॉप, बेसिक फोन, पेनड्राईव्ह ही साधने गोरगरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी वैशाली वीर आणि राजीव म्हसकर यांनी केले. 15 ऑगस्टनंतर ग्रामीण भागात अनेक दानशूर व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे आल्या. गेल्या दोन आठवड्यात 1 सप्टेंबरपर्यंत शिक्षण विभागाला 147 स्मार्टफोन, 79 बेसिक फोन, 36 टॅब्लेट, शैक्षणिक अभ्यासक्रम साठवलेले 177 पेनड्राईव्ह, 21 टिव्ही, 16 संगणक, 4 लॅपटॉप, 53 रेडिओ जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून प्राप्त झाले. दोनजणांनी वायफाय यंत्रणा दिली. हे सर्व साहित्य ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तत्काळ पोहचविण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अनेक मुलांसाठी खुला झाला आहे. या उपक्रमाला दिंडोरी तालुक्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातून अनेक दानशूर व्यक्तींनी गरीब मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार घेतल्याचे हे चित्र कोरोनाच्या संकटकाळात नवी उमेद देणारे ठरले आहे.