कोरोनाच्या संकटामुळे जागरण गोंधळ बंद; 64 व्या वर्षी भाजी विक्रीचा आधार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घेत समाजप्रबोधनासाठी स्वत: शेकडो गाणी आणि पोवाडे रचून आपल्या कणखर आवाजात सादरीकरण करण्यात पिंपळगाव बसवंत येथील लोकशाहीर मधुकर सखाराम जाधव यांनी आयुष्य खर्ची घातले. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे उदरनिर्वाहाचा आधार असलेले जागरण गोंधळ कार्यक्रम बंद झाल्याने वयाच्या 64व्या वर्षी त्यांना आपल्या कुटुंबासाठी भाजी विक्री करण्याची वेळ आली आहे. दिवसभरात चार पैसेही हाती येत नसल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. आयुष्यभर लोककला जिवंत ठेवण्यासाठी धडपड केलेल्या या लोककलाकारासाठी कोरोना परीक्षा घेणारा काळ ठरला आहे.

मूळ कळवण तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील जाधव कुटुंब 1972 च्या भीषण दुष्काळामुळे निफाडच्या पिंपळगाव बसवंत येथे स्थायीक झाले. मजूरकाम करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. या कुटुंबातील मधुकर जाधव यांचे हालाखीच्या परिस्थितीमुळे वयाच्या दहाव्या वर्षी तिसरीतच शिक्षण सुटले आणि ते बालवयातच लोककलेकडे वळाले. प्रारंभी काहीकाळ तमाशा या लोककलेत त्यांनी काम केले. पुढे लेखनाची गोडी निर्माण झाली. समाजप्रबोधनासाठी त्यांनी अनेक पोवाडे व गाणी रचली, त्याचे महाराष्ट्रभर सादरीकरण केले. गाण्यातून व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूणहत्या अशा विविध विषयांवर सामाजिक संदेश दिला. जागरण गोंधळ, देवी, खंडोबा यांची स्वत: गाणी लिहून गायन करून कॅसेट्स काढल्या. ते लोककला जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिले आहेत.

ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जागरण गोंधळ कार्यक्रम करतात. महाराष्ट्रभर ते व त्यांचा लहान मुलगा संदीप हे कार्यक्रम करत आले. दुर्दैवाने संदीप यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मोठा मुलगा मजूरकाम करतो. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रमही बंद झाले आणि सात ते आठ सदस्य असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. अखेर त्यांनी पत्नीचे डोर्ले मोडून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ते व पत्नी दिवसभर भाऊनगर येथे भाजी विक्रीसाठी बसून असतात. मात्र, म्हणावे तसे पैसे हाती येत नाहीत. तासनतास वाट बघूनही ग्राहक येत नाहीत. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

दानशूरांनी पुढे यावे

मधुकर जाधव हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांचे हे हाल थांबावेत यासाठी समाजातील दानशूरांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या