
बारामती येथे 28 जानेवारीला झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने संशयाचा धूर अजूनही कायम आहे. ती दुर्घटना नव्हती, तर घातपात होता असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी चौकशीची मागणी केली. आता मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर भाष्य केले आहे. सरळ चाललेल्या विमानाने अचानक पलटी मारली; कुठेतरी, काहीतरी गडबड झालीय अशी शंका छगन भुजबळ यांनी नाशिक येथील शोकसभेत बोलताना व्यक्त केली.
छगन भुजबळ म्हणाले, देशात विमान, हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले आहेत. पण महाराष्ट्रात अशा प्रकारचा भयानक अपघात एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत पहिल्यांदाच झाला. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही अपघात झाला. पृथ्वीराज चव्हाणही हेलिकॉप्टरबाहेर फेकले गेले होते. माझ्या बाबतीतही असे प्रसंग झाले. परंतु असा अपघात 60 वर्षांच्या सामाजिक आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.
मी स्वत: तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तेव्हा विमान इकडे आले कसे काय? हेच कळेना. टेबल टॉप आहे आणि विमान खाली 50-60 फूट पडले होते. आम्ही पार्थ पवारांना भेटलो तेव्हा त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज होते. त्याच्यामध्ये ते विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या घिरटीवेळी सरळ असलेले विमान हे अचानक पलटी मारल्यासारखे दिसतेय. त्याच्यानंतर काही क्षणात होत्याचे नव्हते होते, असे भुजबळ म्हणाले.
विमान अपघाताची चौकशी होईल. मी काही तज्ज्ञ नाही, परंतु मी अनेकांशी बोललो. त्यामुळे कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे. इंजिनामध्ये किंवा रडारमध्ये. आणखीन काही असू शकते. चौकशी होईल, त्याची माहितीही येईल. पण सोन्यासारखी माणसं गेली ती कशी परत येईल, असेही छगन भुजबळ म्हणाले.


























































