सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी; कालिका देवी मंदिरातही घटस्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सप्तशृंग गड येथे देवी भगवती मंदिरात आज मोठ्या भक्तीमय वातावरणात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नाशिकचे ग्रामदैवत असलेले कालिका देवी मंदिर, चांदवडच्या रेणूका देवी मंदिरासह जिह्यातील सर्वच देवी मंदिरात विधीवत पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. या सर्वच मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंग गड येथे आज सकाळी देवी भगवतीच्या सुवर्णालंकारांची संस्थान कार्यालय ते मंदिर अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र मंडाले यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, मुंबई येथील भूषण पटेल, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते. त्यानंतर विधीवत पद्धतीने घटस्थापना झाली. दिवसभरात 25 हजारांहून अधिक भाविकांनी देवी दर्शनाचा लाभ घेतला.

नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते महापूजा, तर महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष केशव पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, डॉ. प्रताप कोठावळे आदी उपस्थित होते. नाशिक व पंचक्रोशीतील भाविकांनी पहाटेपासून येथे दर्शनासाठी गर्दी केली होती.