राज्यात पुन्हा भगवाच फडकणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नाशिक

दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी खंबीर साथ द्या, आशीर्वाद द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर येथे त्यांच्या दणदणीत सभांना प्रचंड गर्दी उसळली होती. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

जळगावच्या पाचोरा येथून सुरू झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा नाशिकमध्ये शनिवारी तिसरा दिवस होता. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेतले, अभिषेक केला. यानंतर त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारच्या काळात शिवसेनेचे मंत्री आरोग्य, पाणी यासह विविध योजना, प्रकल्प तातडीने मार्गी लावत आहेत. अनेक प्रश्नांवर आलेल्या निवेदनावर तातडीने दखल घेतली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात खुटवडनगरच्या सिद्धीविनायक हॉल येथे त्यांनी नागरिकांशी आणि देवळाली मतदारसंघात सिन्नर फाटा येथे त्यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. शिवसैनिक हा निवडणुकीतच नव्हे तर सतत जनसेवेसाठी कार्यरत असतो. ऐंशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसारच शिवसेनेचे कार्य सुरू आहे, यापुढेही ते असेच सुरू राहील. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानण्यासाठी, ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मने जिंकण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद व खंबीर साथ मिळविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. जनतेचे न्याय, हक्क मिळवून देणारे सरकार स्थापण्यासाठी ही यात्रा आहे. एक नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन ही जनआशीर्वाद यात्रा निघालेली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या, साथ द्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी या सभांमधून केले.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, उपनेते बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

परिवर्तन घडविणारे चित्र – संजय राऊत

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्धांकडून स्वागत होत आहे, आशीर्वाद मिळत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात जात आहेत. बेरोजगार तरुण, शेतकरी, कामगार, महिलावर्ग अशा सर्वच घटकांची आदित्य ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, असे सर्वांनाच वाटत आहे. हे चित्र महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणारे आहे. शिवसेनेची नवी दिशा नवी वाट सुरू आहे, असे आपल्या भाषणात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सामाजिक बांधिलकी जोपासली – एकनाथ शिंदे
शिवसेनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी धाव घेतली. आदिवासी भागात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे टँकर, टाक्या पुरविल्या. शिवसेनेचे समाजसेवेचे, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे क्रत आदित्य ठाकरे हे पुढे नेत आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.