भयमुक्त, समस्यामुक्त नाशिकसाठी शिवसेना, मनसेसह आघाडी कटिबद्ध -वसंत गीते, प्रभाग 2 मध्ये उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

भाजपाने गुंडगिरीला थारा देऊन विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून शहराची प्रचंड वाताहत केली आहे. नाशिक भयमुक्त आणि समस्यामुक्त करण्यासाठी शिवसेना, मनसेसह आघाडी कटीबद्ध आहे. आमच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून शहरात परिवर्तन घडवा, असे आवाहन माजी आमदार वसंत गीते यांनी केले.

महापालिका निवडणुकीतील पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेचे उमेदवार वैभव आप्पासाहेब ठाकरे, मनीषा धमेंद्र बागुल, बालाजी मधुकर माळोदे, मथुरा सुनील गांगुर्डे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार वसंत गीते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये शहर दत्तक घेण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्ष या पक्षाने भ्रष्ट कारभार करून शहराचे वाटोळे केले आहे. गुंडगिरीला थारा देऊन शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला. त्यांची सत्तेची भूक ही न संपणारी आहे. भाजप, महायुतीला पराभवाची धूळ चारण्याची हीच वेळ आहे. शिवसेना, मनसेसह आघाडीची महापालिकेवर सत्ता आणून परिवर्तन घडवा, असे आवाहन केले.

खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, शिवसेनेचे उमेदवार जनतेची सेवा करण्यासाठी, प्रभागाच्या संपूर्ण विकासासाठी सज्ज आहेत. त्यांना भरभक्कम साथ देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. संपर्पप्रमुख जयंत दिंडे यांचेही भाषण झाले. आमच्या या चार स्वाभिमानी, निष्ठावंत उमेदवारांना विजयी करा, असे ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांनीही मनोगत व्यक्त करीत प्रभागातील जनतेची सेवा करणाऱया शिवसेनेच्या या चारही उमेदवारांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, राहुल दराडे, शैलेश सूर्यवंशी, सुनील जाधव यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.