नाशिक विभागाचा दहावीचा निकाल 93.73 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल आज बुधवारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात आला. नाशिक विभागाचा निकाल 93.73 टक्के इतका लागला असून, हा पाच वर्षातील उच्चांक ठरला आहे. विभागात नाशिक जिल्ह्याची टक्केवारी सर्वाधिक 94.93 इतकी आहे.

यंदा कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 23 मार्च रोजी होणारी भूगोल विषयाची लेखी परीक्षा रद्द करावी लागली, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची परीक्षाही घेता आली नाही. कोविडच्या संकटकाळातही मंडळाने कामकाज सुरळीत पार पाडून उत्तरपत्रिकांचे परिक्षण, नियमन व संकलन पूर्ण केले. त्यानंतर आज दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत तीन संकेतस्थळांवर निकाल जाहीर झाला. याद्वारे विद्यार्थ्यांनी विषयनिहाय मिळालेले गुण जाणून घेतले. नाशिक विभागातील चार जिल्ह्यांमधून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 445 केंद्रे होती. विभागात एक लाख 97 हजार 976 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून एक लाख 85 हजार 557 उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 93.73 इतकी आहे. जिल्हानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : नाशिक- 94.93 टक्के, धुळे- 94.50, जळगाव- 93.51, नंदुरबार- 88.14.

विद्यार्थ्यांना गुरुवारपासून अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात संपादित गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी 8 ऑगस्टपर्यंत, छायाप्रतीसाठी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत मिळणे आवश्यक असते. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. या अधिक माहितीसाठी मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांना लगतच्या दोन संधी असतील, अशी माहिती विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील व सचिव नितीन उपासनी यांनी दिली.

पाच वर्षातील उच्चांकी टक्केवारी

यंदाचा नाशिक विभागाचा निकाल गेल्या पाच वर्षातील उच्चांक ठरला आहे. सन 2016 ला 89.61, सन 2017 मध्ये 87.76, 2018 मध्ये 87.42 आणि 2019 ला 77.58 अशी टक्केवारी होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निकाल 16 टक्क्यांनी जास्त आहे.

मुलींचा निकाल 95 टक्के

विभागात 88 हजार 860 पैकी 84 हजार 838 (95.46 टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या. यंदा 1 लाख 9 हजार 116 पैकी 1 लाख 719 (92.30 टक्के) मुले उत्तीर्ण झाली आहेत. यंदाही उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी आघाडी कायम ठेवली आहे.

प्रथम श्रेणीत 71 हजार उत्तीर्ण

विभागात सर्वाधिक 71 हजार 344 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. 67 हजार 467 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. द्वितीय श्रेणीत 38 हजार 979, तर उत्तीर्ण श्रेणीत 7 हजार 767 विद्यार्थी आहेत.

नाशिकच्या 39 टक्के विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य

नाशिक जिल्ह्यात एकूण 84 हजार 558 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील सर्वाधिक 32 हजार 660 (39 टक्के) विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली, त्यापाठोपाठ प्रथम श्रेणीत 31 हजार 933 विद्यार्थी आहेत. द्वितीय श्रेणीत 16 हजार 623, तर उत्तीर्ण श्रेणीत 3 हजार 342 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.