नाशिकच्या भाजीपाल्याची मागणी वाढली, तीन महिन्यांनंतर पुन्हा मुंबई-पुण्याला दुपटीने वाहने रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुण्यासह गुजरात राज्यात नाशिकच्या भाजीपाल्याला कायमच मोठी मागणी असते. मात्र, मागील तीन महिन्यांत लॉकडाऊनमुळे नाशिक बाजार समितीतून पन्नास-साठ वाहनेच जात होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मागणी पूर्ववत होण्यास सुरुवात झाली असून सध्या 120 वाहनांमधून संबंधित शहरातील बाजारपेठांमध्ये भाजीपाला पाठविला जात आहे. मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल अशी आशा आहे.

नाशिक जिल्हा हा भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील बाजार समितीतून दररोज नव्वदहून अधिक वाहने मुंबई व उपनगरात भाजीपाला घेऊन जातात. गुजरात येथे 23, पुणे व इंदूरला प्रत्येकी दोन, तर नागपूर येथे एक अशा एकूण 120 वाहनांतून सध्या भाजीपाला पाठवला जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या. भाजीपाल्यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहनांना यातून सवलत मिळाली असली तरी कोरोना संसर्गाच्या भीतीने सर्वत्र मागणी घटली होती. त्या काळात अवघी पन्नास-साठ वाहनेच नाशिकहून रवाना होत होती अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

एप्रिल व मे या दोन महिन्यांत उन्हाळ्यामुळे तशीही आवक कमी होती. त्यातच कोरोनामुळे तोडणीसाठी शेतमजूर मिळत नव्हते. वाहतुकीसाठी सुविधेचा अभाव असल्याने शेतकरी, व्यापारी बाहेर शेतमाल नेण्यास उत्सुक नव्हते. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच हे चित्र बदलू लागले. मुंबई, पुणे, इंदूर, नागपूरसह गुजरात राज्यातून पुन्हा नाशिकच्या भाजीपाल्याची मागणी वाढलेली दिसून आली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली आहे.

पालेभाज्यांच्या दरात घसरण
लॉकडाऊन काळात कोथिंबिरीची आवक 40 ते 50 हजार जुडी व दर 60 ते 70 रुपये प्रतिजुडी होता. आता आवक 89 हजार 700 जुडी, तर दर किमान 10, कमाल 40 व सरासरी 25 रुपये असे आहेत. मेथीची याआधी 4500 जुडी आवक व भाव 40 ते 45 रुपये होता. आता आवक 10 हजार 500, दर 10 ते 25 रुपयांच्या घरात आहेत. फळभाज्यांची आवक स्थिर आहे. मात्र, वांग्याची आवक दुपटीने वाढलेली आहे. आधी वांग्याची आवक 120 क्विंटल व दर 20 ते 40 रुपये किलो होता. सध्या आवक 247 क्विंटल व दर 10 ते 12 रुपये किलो आहेत.

बाजार समितीतील इतर भाज्यांचे प्रतिकिलोचे दर किमान, कमाल, सरासरी व कंसात आवक पुढीलप्रमाणे :
सिमला मिरची : 50–75-62.50 (110 क्विंटल)
कारले : 17–33–25 (354 क्विंटल)
दोडका : 29–54-42 (51 क्विंटल)
गिलके : 17–25–30 (45 क्विंटल)
भेंडी : 12.50–19-17 रुपये (32 क्विंटल)

टोमॅटोच्या दरात वाढ
मार्च महिन्यात टोमॅटोला तीन ते साडेतीन रुपये किलो इतका कमी दर मिळत होता. मात्र, सध्या टोमॅटोला मागणी आहे. त्या तुलनेत आवक नसल्याने भाव वाढले आहेत. किमान 12, कमाल 32, तर सरासरी 22 रुपये किलो दर मिळत आहे.