नाथसागर जलाशयात वृद्ध व्यापाऱ्याची पत्नीसह आत्महत्या

sunk_drawn

नाथसागर जलाशयात पैठणच्या वृद्ध व्यापाऱ्याने पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. असाध्य आजाराला कंटाळून जीवन संपवत असल्याची चिठ्ठी काठावरील बुटांमध्ये पोलिसांना आढळून आली आहे.

जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाच्या दक्षिण बाजूस भल्या पहाटे साखळी क्रमांक 94 समोर दोन मृतदेह पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना आढळून आले. जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पैठण पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस उप-निरीक्षक सांगळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान घटनास्थळी पोलिसांना जलाशयाच्या काठावर बुट आढळून आले. या बुटाच्या आतमध्ये लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यामुळे मयत जोडप्याबाबत ऊलगडा झाला. यामध्ये शारीरिक व्याधीमुळे आपण आत्महत्या करत असण्याचे लिहून ठेवण्यात आले आहे. सांगळे यांनी सदरील मयतांची ओळख पटण्यासाठी तातडीने यंत्रणा हलवली. त्यामध्ये त्यांना मयतांची ओळख पटण्यास यश आले.

मयताचे नाव सूर्यभान दयाराम राऊत (68) कौशल्या सूर्यभान राऊत (65, रा. काळापहाड; रेणुकादेवी मंदिर परिसर, पैठण) असे आहे. मयतांना 4 मुले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोघांचे शव शासकीय रुग्णालयात हलविले. घटनास्थळी गोपनीय शाखेचे पो. कॉ. गणेश शर्मा, मनीष वैद्य, कर्तारसिंग, कुलट गणेश कुलट, बाबासाहेब शिंदे, संजय राठोड, समाधान भगिले, आदी पोलीस कर्मचारी उपस्थि त होते.

दरम्यान, 4 महिन्यांपूर्वी याच परिसरात पाथर्डी येथील नवविवाहीत दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या जलाशयात पोहताना काही जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. परिणामी नाथसागर जलाशयाच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जायकवाडी प्रकल्प हा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. दहशतवाद विरोधी पथकातर्फे विशिष्ट कालावधीत या परिसराची कसून तपासणी केली जाते. गुप्तवार्ता विभागाचेही धरण परिसरातील घडामोडींवर बारीक नजर असते. त्यामुळे नागरीक व पर्यटकांना वर जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. असे असताना नाथसागर जलाशयात आत्महत्या व अपघाती मृत्यू यासारख्या घटना घडत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या