राष्ट्रहित आणि विकासाच्या मुद्द्यावरच शिवसेना-भाजप महायुती निवडणूक लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

राष्ट्रहित, राष्ट्रसुरक्षा, वैभवशाली हिंदुस्थान आणि पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेला विकास या मुद्यांवरच शिवसेना-भाजप महायुती निवडणूक लढवत असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसच्या देशद्रोही जाहिरनाम्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो असेही ते यावेळी म्हणाले. लातूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत निलंगेकर बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, आमदार सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, मिलींद पाटील, रमेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने राष्ट्रभक्ती आणि विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. पाच वर्षांच्या कार्यकाळात लातूर जिल्ह्यात मोठी विकासकामे झाली आहेत. रेल्वे कोच फॅक्ट्रीचे काम सुरू झाले आहे. किमान 50 हजार जणांना यामुळे रोजगार मिळेल. रोजगाराचे हब लातूर जिल्ह्यात यामुळे होईल. लातूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. सध्या 7 राष्ट्रीय महामार्गांना मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यातील 5 राष्ट्रीय महामार्गाचे कामही सुरू झालेले आहे. 7500 कोटी रुपयांची ही कामे आहेत. लातूररोड ते गुलबर्गा या रेल्वेमार्गासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. 50 टक्के खर्च राज्य सरकार आणि 50 टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे. लातूर जिल्ह्यात केंद्राच्यावतीने राबवण्यात आलेली उज्वला गॅस योजना, जनधन योजना, पिक विमा योजना देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेसने मागील 60 वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात केलेला विकास दाखवावा आणि 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेला विकास दाखवतो, असे आव्हानही निलंगेकर यांनी यावेळी दिले.

काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे वैयक्तीक टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. ही निवडणूक राष्ट्रीय मुद्यावर होत आहे. केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम न करता काँग्रेसने राष्ट्रीय मुद्यावर चर्चा करावी असे आवाहनही त्यांनी केले. लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे चार लाखापेखा अधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत मतदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहूनच मतदान करणार आहे. देशातील मतदार हा राष्ट्रवादी सत्तेच्या पाठीशी उभा राहील, देशद्रोहींच्या पाठीशी उभा राहणार नाही, असेही निलंगेकर यांनी सांगितले.