राष्ट्रीय स्मारके, पुतळय़ांची विटंबना केल्यास ऍट्रॉसिटी लावा! तंत्र कायदा करण्याची शिवसेनेची मागणी

245
bmc-2

राष्ट्रीय स्मारके, पुतळ्यांची विटंबना तसेच हिंदुस्थानच्या राज्यघटनेचा अवमान केल्यामुळे हिंसाचार, जातीय तणाव निर्माण होतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पोलीस आणि प्रशासनावरही त्याचा ताण निर्माण होतो. या सगळ्याला आळा घालण्यासाठी ऍट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करा, अशी मागणी शिवसेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

मुंबईत राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे आणि अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. राष्ट्रीय आणि सामाजिक पातळीवर काळजीपूर्वक आणि दक्षतेने पुरातन वास्तूंचे जतन केले जात आहे. त्याचबरोबर जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या हिंदुस्थानची राज्यघटना ही वैशिष्टय़पूर्ण लिखित राज्यघटना आहे. परंतु काही वेळा समाजविघातक प्रवृत्ती राज्यघटना, राष्ट्रध्वजाचा अवमान करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. जातीय तसेच धार्मिक विद्वेष पसरतो. हिंसाचार होऊन सामान्यांच्या जीविताला, मालमत्तेस आणि राष्ट्रीय संपत्तीला हानी पोहचते. परिणामी जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे अशा समाजविघातक लोकांना आळा घालण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रपुरुषांचे पुतळे तसेच हिंदुस्थानची राज्यघटना यांचा अवमान केल्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींविरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याच्या धर्तीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. पालिकेने त्यासाठी स्वतंत्र कायदा केला तर अशा घटनांना आळा बसू शकेल- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

आपली प्रतिक्रिया द्या