शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारला मान्य करावेच लागेल; विनेश फोगाटने केंद्र सरकारला ठणकावले

शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी शंभू बॉर्डरवर ठाण मांडून आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना ठाण मांडून 200 दिवस पूर्ण झाले आहेत. या आंदोलनाला 200 दिवस पूर्ण झाल्याने या आंदोलनात कुस्तीपटू विनेश फोगाटही सहभागी झाली होती. शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारला एकावेच लागेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

यावेळी कुस्तीपटू विनेश फोगट म्हणाली की, तुमच्या आंदोलनाला आज 200 दिवस पूर्ण होत आहेत. मी देवाला प्रार्थना करतो की तुम्ही इथे जे काही मिळवण्यासाठी – तुमच्या हक्कासाठी, न्यायासाठी… आला आहात. तुमची मुलगी तुमच्या पाठीशी उभी आहे. मी सरकारलाही विनंती करते की, आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमच्या हक्कासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. हे आंदोलन राजकीय नाही.त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांचे एकावेच लागेल, असेही तिने सांगितले.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत. कुस्तीपटू विनेश फोगाटचा शेतकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये,असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना दिल्लीकडे मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर 13 फेब्रुवारीपासून शेतकरी शंभू बॉर्डरवर ठाण मांडून आहेत.

शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही पुन्हा एकदा सरकारसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत. तसेच आमचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तसेच अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने केलेल्या शेतकरी विरोधी विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला. तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.