
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. मजुरांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून 22 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एक मजूर अपघातातून बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
सर्व कामगार आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गेलापुखुरी चहाच्या मळ्यातील होते. ते अरुणाचल प्रदेशातील एका प्रकल्पाच्या ठिकाणी कंत्राटावर काम करण्यासाठी जात होते. यादरम्यान तीव्र वळणे, तीव्र उतार आणि खोल दरी असलेल्या धोकादायक रस्त्यावर हा अपघात झाला.
घटनास्थळी उंच उतार, अत्यंत कठीण भूभाग आणि खराब रस्ते यामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि सैन्याची पथके संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.


























































