
कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करू नये, यासाठी गुजरातमधील एका व्यावसायिकाने आपल्या संपूर्ण गावातील लोकांचे कर्ज फेडले आहे. ही घटना गुजरातमधील अमरेली जिह्यातील जिरा गावात घडली आहे. या गावातील 290 शेतकरी गेल्या 30 वर्षांपासून कर्जाच्या खाईत अडकले होते. याच गावचे रहिवासी बाबूभाई जिरावाल यांनी या सर्व शेतकऱ्यांवर असलेले एकूण 90 लाखांचे कर्ज स्वतःहून फेडले आहे.
जिरा गावात 1995 सालापासून सेवा सहकारी मंडळाबाबत एक मोठा वाद सुरू आहे. या समितीच्या तत्कालीन प्रशासकांनी शेतकऱ्यांच्या नावाने फसवी कर्जे काढली. हे शेतकऱ्यांना माहितीच नाही, परंतु त्यांच्या नावावर कर्ज असल्याने या कर्जात मोठी वाढ झाली. कर्जामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत, कर्ज आणि अन्य लाभांपासून वंचित ठेवण्यात आले. बँकांनी गावातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला. कर्जाचा अभाव त्यांना त्रास देत होता. कर्जामुळे जमिनीचे विभाजन करणेही अशक्य होते म्हणून माझ्या आईला गावातील शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी तिचे दागिने विकायचे होते. आईची इच्छा आम्ही दोन्ही भावांनी मिळून पूर्ण केली, असे बाबूभाई जिरावाला यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी मी आणि माझा भाऊ बँक अधिकाऱ्यांना भेटलो. आमची इच्छा त्यांना बोलून दाखवली. बँकेनेही कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात सहकार्य केले. गावातील शेतकऱ्यांवर एकूण 89 लाख 89 हजार 209 रुपयांचे कर्ज होते. आम्ही ते कर्ज फेडले व बँकेकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळवले आणि ते सर्व शेतकऱ्यांना वाटले. आमच्या आईची इच्छा पूर्ण करत तिला खरी श्रद्धांजली वाहिल्याबद्दल मी व माझे कुटुंब आनंदी आहोत, असे बाबूभाई म्हणाले.
            
		





































    
    



















