…तोपर्यंत मोदीजी त्यांच्या A 1 मित्राची मदत करत राहतील! हिंडेनबर्गच्या नव्या आरोपांवरून मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

हिंडेनबर्ग यांनी गेल्या वर्षी अदानी समुहावर केलेल्या आरोपांमुळे या कंपनीचे शेअर गडगडले होते. आता हिंडेनबर्ग यांनी पुन्हा नव्याने केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता हिंडेनबर्गने गौतम अदानी आणि शेअर बाजार नियामकच्या (सेबी) प्रमुख माधवी पुरी-बूच यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप होत आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही एनडीए सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हिंडेनबर्गच्या नवीन अहवालात गौतम अदानी आणि माधवी पुरी-बूच यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला आहे. या नव्या आरोपांबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हिंडेनबर्गने जानेवारी 2023 मध्ये केलेल्या खुलाशांनंतर सेबीने मोदीजींचे जिवलग मित्र गौतम अदानी यांना सर्वोच्च न्यायालयासमोर क्लीन चिट दिली होती. आता त्याच सेबी प्रमुखाचे अदानींसोबत आर्थिक संबंध उघड झाले आहेत. मध्यमवर्गातील लहान आणि मध्यम गुंतवणूकदार त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे शेअर बाजारात गुंतवतात. त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे, कारण त्यांचा सेबीवर विश्वास असतो. जोपर्यंत या महाघोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत(JPC) चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी आपल्या A1 मित्राला मदत करत राहतील आणि देशाच्या घटनात्मक संस्थांचे तुकडे होत राहतील, अशी टीका खरेग यांनी पोस्टमधून केली आहे.

अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले की, अदानी घोटाळ्यातील ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती. माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी 5 जून 2015 रोजी सिंगापूरमध्ये IPE प्लस फंड 1 मध्ये त्यांचे खाते उघडले होते. यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक 10 मिलियन डॉलर्स एवढी होती. हा ऑफशोअर मॉरिशस फंड अदानी ग्रुपच्या संचालकाने इंडिया इन्फोलाईनच्या माध्यमातून स्थापन केला होता, असा दावा हिंडनबर्गने केला आहे. या आरोपांमुळे पुन्हा एकदा विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.