ट्रम्प खोटारडे आहेत हे बोलायची तुमच्यात हिंमत आहे काय? राहुल गांधी यांचा तुफान हल्ला, संसदेत ‘सिंदूर’वरून विरोधकांनी सरकारचा धूर काढला

‘ऑपरेशन सिंदूर’वरून संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारचा धूर काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या 36 मिनिटांच्या मुद्देसूद भाषणात सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘आम्हीच हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध थांबवले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा केला आहे. आपल्या पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल तर ट्रम्प खोटारडे आहेत हे त्यांनी सभागृहात सांगावे,’ असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये झालेल्या नुकसानीवरूनही राहुल यांनी मोदींना घेरले. ‘देशाच्या सैन्याचा वापर राष्ट्रहितासाठी व्हायला हवा. मात्र आपले पंतप्रधान स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी सैन्याचा वापर करत आहेत हे अतिशय धोकादायक आहे. असल्या पंतप्रधानांना आम्ही सहन करू शकत नाही, असा हल्ला राहुल यांनी चढवला.

आसीम मुनीरला ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये का बोलावले?

आम्ही पाकिस्तानला रोखले असे आपले परराष्ट्रमंत्री व संरक्षण मंत्री म्हणतात. तसे असेल तर पहलगामचा मास्टरमाइंड आसीम मुनीर याला ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये डिनरसाठी कसे बोलावले? पंतप्रधान मोदीही जिथे जाऊ शकत नाहीत तिथे मुनीर गेले. युद्ध न केल्याबद्दल ट्रम्प यांनी मुनीर यांचे आभार मानले. ट्रम्पना आपण याचा जाब का विचारला नाही? दहशतवाद पसरवणाऱया पाकिस्तानला घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ दहशतवाद कसा रोखायचा याच्या परिषदा घेतो, हे सगळे आपण सहन कसे करतो? आपले परराष्ट्र मंत्री कोणत्या ग्रहावर बसलेत? त्यांनी खाली यायला हवे, असा सणसणीत टोला राहुल यांनी हाणला.

राहुल यांनी मोदींना पाणी पाजले!

आम्ही आमचे लक्ष्य पूर्ण केले. जर तुम्ही काही केले तर महागात पडेल हे आम्ही दाखवून दिले, असे मोदी दरडावून सांगत होते तेव्हा राहुल यांनी डिवचले. ‘ट्रम्प खोटं बोलत आहेत, असे का सांगत नाही’, असे ते बोलताच मोदी थांबले. वैतागले. पाण्याचा ग्लास उचलून घटाघट पाणी प्यायले आणि डोळे वटारून राहुल यांच्या दिशेने पाहू लागले. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत ट्रम्प यांचे नाव घेऊन, राहुल यांनी मोदींना पाणी पाजले, असा टोला हाणला आहे. करण थापर यांनी मुलाखतीत अडचणीचे प्रश्न विचारले तेव्हाही मोदींना पाणी प्यावे लागले होते. तो क्षण आज सर्वांच्या डोळ्यापुढे आला.

30 मिनिटांत आपण शरणागती पत्करली!

राजनाथ सिंह यांच्या भाषणाचा हवाला देत राहुल यांनी सरकारला काेंडीत पकडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ 1 वाजून 05 मिनिटांनी सुरू झाले आणि 1 वाजून 35 मिनिटांनी आपण पाकिस्तानला पह्न करून सांगितले की, आम्ही तुमच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत. आम्हाला युद्ध करायचे नाही. अवघ्या 30 मिनिटांत आपल्या सरकारने शरणागती पत्करली. हे मी म्हणत नाही, आपल्या संरक्षणमंत्र्यांनीच हे सांगितले याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.

सैन्याचे हात बांधल्याने विमाने पडली!

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी हवाई दलाला पूर्ण मोकळीक देण्यात आली नव्हती. मोदी सरकारने हवाई दलाला हल्ले करायला सांगितले, पण पाकिस्तानच्या लष्करी तळांना किंवा हवाई बचाव यंत्रणेला लक्ष्य करू नका असेही सांगितले. अशा परिस्थितीत आपली विमाने पडणे साहजिक आहे. राजकीय नेतृत्वाने हात बांधल्यामुळे आम्ही लढाऊ विमाने गमावली. सरकार यावर बोलत नाही; पण हे सर्वांना माहीत आहे, असे राहुल म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या निम्मी जरी हिंमत असेल तर हिंदुस्थानने एकही लढाऊ विमान गमावले नाही हे मोदींनी सांगावे, असेही राहुल गांधी यांनी ठणकावले.