चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत… हिंदुस्थानचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश

चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. मी माझ्या मागील ब्रीफिंगमध्ये या विषयावर बोललो होतो. माझ्याकडे आणखी काही सांगायचे नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना गुरुवारी रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील कोणतीही चर्चा द्विपक्षीय असावी ही आमची भूमिका तुम्हाला चांगली माहिती आहे. चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी ज्या कुख्यात दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला देण्यात आली होती, त्यांना हिंदुस्थानकडे सोपवण्याबाबत आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे जयस्वाल पुढे म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरवरील कोणतीही द्विपक्षीय चर्चा ही केवळ पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आक्रमण केलेला हिंदुस्थानचा भूभाग सोडून जाण्यावरच असेल, असेही जयस्वाल यांनी ठणकावून सांगितले. तसेच जोपर्यंत पाकिस्तान विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चीनमध्ये त्रिपक्षीय चर्चा झाली. याबद्दल रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्ही काही अहवाल पाहिले आहेत. याशिवाय, माझ्याकडे आणखी काही सांगायचे नाही.