दाट धुक्यामुळे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर 25 गाड्या एकमेकांना धडकल्या, अपघातात चार जणांचा मृत्यू

उत्तर हिंदुस्थानातील बहुतांश भागात दाट धुके पसरले आहे. यामुळे दुश्यमानता कमी झाल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. धुक्यामुळे सोमवारी पहाटे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एकामागून एक 25 वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम दोन ओव्हरलोडेड डंपरची एकमेकांना टक्कर झाली. यानंतर मागून येणाऱ्या पेरूंनी भरलेल्या ट्रकने या वाहनांना धडक दिली. ट्रक उलटताच, मोठ्या प्रमाणात पेरू रस्त्यावर सांडल्याने रस्ता निसरडा झाला. धुक्यामुळे आणि रस्त्यावर पसरलेल्या फळांमुळे, मागून येणाऱ्या वाहनांना वेळेवर ब्रेक लावता आला नाही. यामुळे 25 गाड्या एकमेकांवर धडकल्या.