जयपूर-बिकानेर महामार्गावर भाविकांची बस ट्रकला धडकली, अपघातात 4 जणांचा मृत्यू; 27 जण जखमी

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात जयपूर-बिकानेर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. भाविकांच्या बसची ट्रकला समोरासमोर धडक झाल्याने ही घटना घडली. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. सर्वजण वैष्णोदेवीचे दर्शन करून जम्मू-कश्मीरहून गुजरातला परतत होते. यादरम्यान मंगळवारी रात्री जयपूर-बिकानेर महामार्गावर बसची ट्रकला धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य 27 जण जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या 15 जणांना सीकर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 13 जणांना फतेहगड येथे प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला सीकर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.