
धुक्यामुळे पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने मागून येणाऱ्या बसने बोलेरोला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरोमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला आहे. बोलेरोमधील कुटुंब अस्थी विसर्जनासाठी चालले होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या बांदा येथे बुंदेलखंड एक्सप्रेस वे वर ही घटना घडली. महोबा जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील आठ जण बोलेरो गाडीने प्रयागराज येथे अस्थिविसर्जनासाठी चालले होते. धुक्यामुळे बुंदेलखंड एक्सप्रेस वे वर बोलेरो थांबवली होती. याचवेळी मागून आलेल्या खासगी बसने बोलेरोला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की बोलेरोचा चक्काचूर झाला. बोलेरोतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

























































