राजधानी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा होत असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शिवखोडीला दर्शन घेतल्यानंतर माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 33जण जखमी झाले आहेत. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी झालेल्या अनेक भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराचे जवान, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. घटनेनंतर दहशतवादी जंगलात पळून गेले आहेत. ते सर्व राजौरी, पूंछ आणि रियासी भागात लपून बसले असण्याची शक्यता आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. बसमध्ये सुमारे 50 भाविक होते. अचानक झालेल्या हल्ल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.