खलिस्तान्यांकडून लाल किल्ला आणि दिल्ली विधानसभा बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभा आणि लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. खलिस्तानी गटाच्या नावाने दिल्ली पोलिसांना सोमवारी सकाळी ई-मेलद्वारे ही कथित धमकी देण्यात आली. मेल प्राप्त झाल्यानंतर बॉम्ब पथक आणि सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली विधानसभा आणि लाल किल्ला परिसराची कसून तपासणी केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

खलिस्तानी गटाच्या नावाने धमकीचा मेल कुणी पाठवला, याबाबत सायबर सेल तपास करत आहे. शोध मोहिमेदरम्यान कोणतीही धोकादायक किंवा हानिकारक वस्तू आढळली नाही, परंतु आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

दोन शाळांनाही बॉम्बची धमकी

दिल्लीतील दोन शाळांनाही बॉम्बची धमकी मिळाली आहे. दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील आर्मी पब्लिक स्कूल आणि लोधी कॉलनीतील एअर फोर्स बाल भारती शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली. खबरदारी म्हणून शाळेच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.